Monday, February 13, 2012

चला, एकत्र येऊन करुन दाखवूया...

शिक्षण हा आपल्या सारख्या प्रगतीशील राष्ट्राचा पायाभूत घटक आहे. केवळ कायदेशीर तरतुदीतून हे काम साध्य होणार नाही. अथक प्रयत्‍नातूनच आपण हे ध्येय साध्य करू शकतो. ह्यासाठी गरज आहे आपल्या क्रियाशील सहभागाची. प्रत्येक नागरिकाला माहित आहे की प्रत्येक मुलाला (वय ६ ते १४) मोफत शिक्षण घेण्याचा हक्क कायद्याने दिला आहे. हा हेतू आपण साध्य करणार आहोत यात शंका नाही. फक्त तो अमलात आपल्याला आणायचा आहे.

आपल्या समाजातील काही घटक शिक्षणाच्या मुलभूत हक्कापासून वंचित आहेत. हे त्या घटकांचे कमनशीब आणि आपला पराभव आहे. जर समाजातील विशिष्ट वर्ग प्रगतीपासून दूर असेल तर सर्वांगीण प्रगतीचे स्वप्‍न अशक्य आहे. स्वातंत्र्य मिळून ५० वर्षे झाल्यानंतर सुद्धा शिक्षणासकट सर्व मुलभूत गरजांसाठी समाजाला लढा द्यावा लागत असेल तर हे आपले दुर्देव आहे. आपणच जागरूक झालो नाही तर सरकारला दोष देण्यात काय अर्थ?

अशा एका मागास समाजाचे आपण जबाबदार नागरिक आहोत. आपण जबाबदारी घेऊया त्यांना शिक्षणास मदत करण्याची. त्यांना आपण शिकवायची गरज नाही. गरज आहे ती पुण्यातील अनेक सरकारमान्य शाळात त्यांना प्रवेश मिळवून द्यायची. काही कारणांनी शाळेतील वर्ग ओस पडले आहेत तर दुसरीकडे रस्त्यावर शिक्षणाला मुकलेली मुले फिरत आहेत. ही पोकळी भरून काढण्यासाठी प्रत्येक मुलाला शाळेत दाखल करण्याचा निश्चय करुया. मुलांच्या शिक्षणात रस असणारे आपण सर्व एकत्र येऊन चर्चा करू आणि हा प्रयोग यशस्वी करू. शिक्षण क्षेत्रातील अनुभवी, तज्ञ, उत्साही, तरुण, आणि बदल घडवून आणण्याची इच्छा असणारे नागरिक ह्यांच्या मदतीने हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी 'एव्हरी चाइल्ड काउंट्स' अर्थात्‌ 'एक एक मूल मोलाचे' नागरिक अभियान आखण्यात आले आहे, ज्याचा प्राथमिक आराखडा आता तयार आहे. गरज आहे ती फक्त हजारो हातांची.

आमचा विश्वास आहे की एक एक मूल मोलाचे आहे. ह्या विचारांचा प्रसार प्रत्येक नागरिकापर्यंत करण्याचा आमचा प्रयत्‍न आहे. हे एक नागरिक अभियान आहे. जे पालक मुलांना शिक्षण देवू शकत नाहीत, त्यांनाच बेजबाबदार म्हणता येणार नाही. आपले सरकार मोफत व हक्काचे शिक्षण देण्यात अयशस्वी झाले तरी फक्त तेच कारणीभूत ठरवता येणार नाही. आपण शिक्षित नागरिक, ज्यांना शिक्षणाचा फायदा झाला, पण प्रत्येक मुलापर्यंत तो पोहोचवला नाही, असे आपणही जबाबदार आहोत. तर आपण प्रत्येक मुलाला शिक्षण मिळवून द्यायची जबाबदारी घेऊया.

पुण्यातल्या ६-७ वर्षांच्या प्रत्येक मुलाला जवळच्या शाळेत दाखल करण्याचे ध्येय ठरवले आहे. अजून जून २०१२ म्हणजे ६ महिन्यांचा अवधी आहे. कामाचा आवाका खूप मोठा आहे, पण आम्हाला खात्री आहे की सर्व नागरिकांच्या सहकार्याने हे ध्येय आपण पूर्णत्वास नेऊ. प्रत्येक नागरिकाला ह्या चळवळीत अनेक तर्‍हेने मदत करता येईल. ह्या कामासाठी तांत्रिक, सरकारी, आर्थिक, प्रसार-माध्यमे आणि अनेक गोष्टींची मदत लागणार आहे.

आपण ही चळवळ निश्चित यशस्वी करू आणि पुढच्या पिढीचा विकास घडवून आणू.

'एव्हरी चाइल्ड काउंट्स' अभियानात सहभागी होण्यासाठी,
लिहा everychildcounts.pune@gmail.com वर किंवा
संपर्क करा रजनी परांजपे यांच्याशी 9371007844 वर किंवा
मंदार शिंदे यांच्याशी 9822401246 वर.

अधिक माहितीसाठी,
पहा http://everychildcounts-pune.blogspot.com किंवा
सामील व्हा http://on.fb.me/eccpune वर किंवा
फॉलो करा http://twitter.com/eccpune ला.

चला, एकत्र येऊन करुन दाखवूया...

No comments:

Post a Comment