'एव्हरी चाइल्ड काउंट्स' अर्थात् 'एक एक मूल मोलाचे' ही मोहीम राबवताना मुख्यत्वे करून भाषेचा प्रश्न मोठा असेल. पुण्यातील मजूर हे जास्ती करून परराज्यातील आहेत पण महापालिकेच्या शाळा मराठी माध्यमाच्या आहेत. ह्या मुलांना मराठी शाळेत दाखल करून घेताना पालकांकडून काही प्रश्न विचारले जातील.
- शिक्षकांची मराठी भाषा मुलांना समजणार का?
- आम्ही जर काम संपल्यावर आमच्या गावी जाणार तर मराठी शिकण्याचा आग्रह का?
- जर आम्ही कर्नाटक, राजस्थान, बिहार, आंध्र अशा आमच्या राज्यात परत जाणार तर मराठी शिकणे हा वेळेचा अपव्यय नाही का?
- जर आमची मातृभाषा तेलगु, तमिळ, कन्नड, बंगाली, हिंदी आहे तर आमच्या मुलांनी मराठी कशासाठी शिकायचे?
तर आपण हे प्रश्न कसे सोडवायचे?
कोणत्याही लहान मुलाला नवीन भाषा शिकणे अवघड नसते. मोठ्यांपेक्षा लहान मुले नवीन भाषा पटकन शिकतात. पालकांना असे वाटते की मराठी माध्यम हे मुलांच्या शिक्षणातील अडथळा ठरू शकेल. खालील काही उदाहरणे/कारणे सांगून तुम्ही त्यांना पटवून देऊ शकता.
१. शाळेत जाणारे मूल हे ‘कसं शिकायचं’ हे सहज शिकू शकते. मग मातृभाषा कोणतीही असो. जरी मूल गावी गेले तरी नवीन शाळेत मातृभाषेतून शिक्षण सहज आत्मसात करू शकते.
२. जर सर्व कुटुंब ४/५ वर्षे इथे राहिले तर मराठी भाषेचा वापर दैनंदिन व्यवहारांसाठी करू शकतात. स्थानिक भाषा येत असल्यामुळे मुलाचा व सर्व कुटुंबाचा येथील रहिवास सुखकारक होईल.
३. मराठी आणि हिंदीची लिपी एकच म्हणजे देवनागरी. त्यामुळे मुलांना मराठी व हिंदी वाचन व लेखन सुलभ होईल. हिंदी ही संपूर्ण भारतात वापरली जाणारी भाषा असल्यामुळे मराठी भाषा शिकणे कधीच वाया जाणार नाही.
शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या पालकांशी संवाद साधताना सर्व स्वयंसेवकांना वरील माहितीची मदत होईल.
No comments:
Post a Comment