Saturday, February 11, 2012

कुणीतरी तुमची वाट पाहतंय...

मी 'एव्हरी चाइल्ड काउंट्स' या कॅम्पेनसाठी काम करते. या मोहिमेचा उद्देश आहे - पुण्यातील सर्व सहा वर्षे वयाच्या मुलांना जून २०१२ मध्ये म.न.पा.च्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून देणे. यांपैकी बहुतेक मुले पुण्यातल्या बांधकामांवर, विटभट्ट्यांवर वगैरे काम करणार्‍या विस्थापित मजूरांची असतील. या मुलांसाठी बालवाडी, नर्सरी सारख्या विशेष सोयी उपलब्ध नसल्याने एव्हरी चाइल्ड काउंट्स (इसीसी) शक्य असेल तिथे शाळा-तयारी वर्ग चालवण्याचा प्रयत्‍न करते.

माझ्यासाठी बांधकाम मजुरांच्या मुलांच्या अशा वर्गांना भेट देणे काही नविन नाही. पण इसीसीचा वर्ग सुरु होण्यापूर्वीची ही भेट मात्र धक्कादायक होती. शाळेपासून वंचित असलेल्या मुलांची आकडेवारी कागदोपत्री खूप वेळा वाचली असली तरी अशी मुले प्रत्यक्ष पाहिल्यावर आपल्याला काहीच वाटणार नाही का?

आज ही मुले याठिकाणी सहज जमली नव्हती तर 'एव्हरी चाइल्ड काउंट्स' (एक एक मूल मोलाचे) या नागरिक अभियानाच्या प्रयत्‍नामुळे जमली होती. कोंढव्यातील विविध बांधकामांवरील प्राथमिक पाहणीनंतर या बिल्डरने आम्हाला बांधकाम मजुरांना भेटण्याची परवानगी दिली. त्यानंतर आम्ही या मजुरांकडून त्यांच्या व आसपासच्या बांधकाम मजुरांच्या मुलांबद्दल प्राथमिक माहिती मिळवली. या माहितीच्या आधारे बिल्डरने 'इसीसी'ला अभ्यासवर्ग चालू करण्याची परवानगी दिली. तो हा पहिला दिवस...आणि ही सारी मुले - मूर्तिमंत उत्साह!

तिथे मुले तरी किती, आणि दृश्य काय! एक ४-५ महिन्याचे मूल शांतपणे सिमेंटच्या गोणीवर झोपलेले व ३६ मुलांनी शिक्षिकेभोवती गराडा घातलेला. यातील ६-७ मुले कडेवर लहान भावंडांना घेऊन आलेली. खरे तर ही सर्व मुले शाळेत जायला हवीत. आई-वडिलांच्या कामाच्या स्वरूपामुळे आज इथे तर उद्या तिथे. नवीन भाषा, नवीन जागा, रोज नवे चेहरे यामुळे मुले पार गोंधळून गेलेली. मग या सर्व गोंधळात मुलांची शाळा राहूनच गेलेली.

यातील बरीच मुले कधीही शाळेत गेली नाहीत. नर्सरी-बालवाडी हे शब्द कानावर पडलेच नाहीत. आता मात्र गाणी, गोष्टी कानावर पडताच चेहरे फुलले. लहान-मोठी मुले गोष्टीची पुस्तके हातात घेऊन चित्रे पाहू लागली. चित्रांचे अर्थ विचारू लागली. शिक्षणाचा गाभा म्हणजे कुतूहल. ते मात्र प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दिसत होते. थोड्या वेळात आम्ही “माझ्या आईचं पत्र हरवलं... ते मला सापडलं...” हा खेळ खेळू लागलो. आता लहान-मोठे, शिक्षक-मुले सर्व बंध गळून पडले. पाहता-पाहता दोन मराठी वाक्ये मुले शिकली...अगदी नकळत.

आमची निघायची वेळ झाली. बिल्डरने मुलांसाठी काही बिस्किट पुड्यांची व्यवस्था केली होती. मुले खाता-खाता निरोप घेऊ लागली. सर्वानी आम्हाला उद्या या... परवा पण या... रोज-रोज या... असे सांगितले.

आम्हाला हेच हवे आहे, पण त्यासाठी बर्‍याच अडचणींना सामोरे जावे लागेलः बिल्डरची परवानगी, योग्य शिक्षकाचा शोध, त्यांची नेमणूक व पगार, मुलांसाठी पुस्तके, खेळ, वगैरे वगैरे. या साइटवरच्या वर्गाचा खर्च बिल्डर उचलेल अशी आम्ही आशा करतो. त्याने फक्त याच वर्गाला मदत होईल असे नाही तर खराखुरा विकास साधण्यासाठी पोषक वातावरणही तयार होईल.
आणि अर्थातच, एक एक मूल मोलाचे आहे, त्या प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा हक्क आहे... यासाठी निरनिराळ्या संधी उपलब्ध करुन द्यायच्या आहेत - आपल्याला!


अर्चना व्यवहारकर
archana.vyavaharkar@gmail.com
everychildcounts-pune.blogspot.com

No comments:

Post a Comment