भारतीय राज्यघटनेनं प्रत्येक मुलाला मोफत शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे. परंतु आजूबाजूला नजर टाकल्यास आपल्याला दिसून येतील अनेक अशी मुलं जी आजही शाळा, शिक्षण, अभ्यास यांपासून दूर आहेत. काही आर्थिक कारणांमुळं, काही सामाजिक कारणांमुळं, किंवा काही कौटुंबिक कारणांमुळं. उदाहरणार्थ, बांधकाम मजूरांची मुलं. कामाच्या ठिकाणी चार-सहा महिने वस्ती करुन नंतर दुसर्या ठिकाणी स्थलांतरित होत राहणारी ही कुटुंबं. यांची मुलं कुठल्या शाळेत जातात? त्यांच्या शाळा-प्रवेशासाठी पालकांना वेळ मिळतो का? दर चार-सहा महिन्यांनी नवी शाळा शोधणं आणि पुन्हा प्रवेश घेणं त्यांना जमतं का? शाळा, शाळेतले शिक्षक त्यांना कितपत सहकार्य करतात? आणि या सर्व सामाजिक परिस्थितीत एक सुजाण नागरिक म्हणून आपली भूमिका काय?
पुण्यात मुलांच्या शिक्षणासाठी काम करणार्या काही संस्था, काही व्यक्ती या मुद्यावर एकत्र आल्या आहेत. आणि सुरु झालं आहे एक नागरिक अभियान - सिटीझन्स कॅम्पेन - 'एव्हरी चाइल्ड काउंट्स' अर्थात् 'एक एक मूल मोलाचं'. निश्चय केला आहे पुण्यातील प्रत्येक सहा वर्षांचं मूल शाळेत धाडण्याचा. जून २०१२ मध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश घेण्याच्या वयाची सर्व मुलं शोधून काढायची आहेत. त्यांना जवळच्या म.न.पा. शाळेत प्रवेश मिळवून द्यायचा आहे. आणि यासाठी लागणार्या सर्व गोष्टींची जुळणी 'एव्हरी चाइल्ड काउंट्स' च्या अंतर्गत करण्यात येत आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं ना? मग जून २०१२ मध्ये पुण्यातली सगळी सहा वर्षांची मुलं शाळेत गेलीच पाहिजेत, हा निश्चय आम्ही केलाय. तुम्हीही तुमच्या भागातील अशी मुलं शोधून त्यांना शाळेपर्यंत पोचण्यास मदत करू शकता. एक जबाबदार नागरिक म्हणून या मोहिमेत सहभागी व्हा. हे कसं करता येईल त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल.
आमच्याशी संपर्क साधण्यासाठी कॉल करा -
रजनी परांजपे ९३७१००७८४४
मंदार शिंदे ९८२२४०१२४६
http://everychildcounts-pune.blogspot.com
No comments:
Post a Comment