प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार आहे, असं सगळे शिक्षणतज्ञ म्हणतात आणि शिक्षणाचा अधिकार हा कायदा देखील तेच म्हणतो. पण प्रत्येक मुलाला शिक्षण कसं मिळेल किंवा प्रत्येक मुलापर्यंत शिक्षणाची गंगा कशी पोचेल, असा प्रश्न उभा राहतो. मुलांची शाळेशी गाठ कशी पडायची? त्यांच्या आई-वडिलांनी अथवा पालकांनी ती पाडायची का? याचं उत्तर खरं तर 'हो' असंच आहे. पण ही वस्तुस्थिती आहे का? किती पालकांना शिक्षणाच्या अधिकारासंबंधी माहिती किंवा जाण आहे? आणि किती पालकांना शिक्षणाचं महत्त्व वाटतं? ज्या मुलांच्या आई-वडिलांना शाळा कुठं आहे हेच माहित नाही त्यांचं काय? त्यामुळं किंवा अशा कारणांमुळं जी शाळेपर्यंत पोचू शकत नाहीत त्या मुलांचं काय?
असे अनेक प्रश्न! यांची उत्तरं कोणाकडं आहेत?
आपल्याकडं आहेत याची उत्तरं! आपण या लोकशाहीच्या मार्गानं जाणार्या देशाचे नागरिक, तसंच या सुसंस्कृत समाजाचे घटक या नात्यानं आपणा प्रत्येक सामान्य नागरिकाकडं या प्रश्नाचं उत्तर आहे. आपण या प्रश्नावर विचार करून कृती करून दाखवू.
आपण काय करु शकतो?
सुजाण आणि जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकानं या मोहिमेत – अभियानात सहभागी व्हायचं आहे. कारण, एक-एक मूल मोलाचं आहे. शाळेत जाण्यायोग्य, म्हणजे सहा वर्षांच्या प्रत्येक मुलाला आपण तिथपर्यंत पोचवू असा 'पण' करायचा आहे. सहा वर्षांचं प्रत्येक मूल सरकारी शाळेत प्रवेश घेऊ शकतं. भले ते झोपडपट्टीत राहत असो वा सोसायटीत, फुटपाथवर असो वा पुलाच्या कमानीखाली, बंगल्यात राहणारं असो वा झोपडीतलं, अनाथ अथवा सनाथ, जनगणनेत मोजलेलं असो अथवा नसो! एक-एक मूल मोलाचं आहे!
हे अभियान फार धाडसाचं वाटतं का?
हो तर! हा नक्कीच धाडसी विचार आहे. पण तो आपल्याला प्रत्यक्षात आणता येईल. जर आपण एकदिलानं हे एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन काम केलं तर काहीच कठीण नाही. आपल्याला प्रत्येक मूल, जे शाळेत जायला हवं ते तिथपर्यंत पोचवायचं आहे.
पुण्यातल्या सर्व मुलांना प्रवेश मिळण्यासाठी अर्थात पुरेशा सरकारी शाळा आहेत किंवा असायला हव्यात. जून-२०१२ पर्यंत जी मुलं सहा वर्षांची होतील ती जवळच्या शाळेत जायला हवीत. ती जात आहेत की नाही, हे आपल्याला बघायचं आहे.
प्रवेशाची प्रक्रिया तशी साधी आहे; पण त्याचा आवाका फार मोठा आहे. म्हणून तो एका संस्थेला किंवा एखाद्या गटाला पेलता येणार नाही. यासाठी नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग असायला हवा. हे नागरिकांचं अभियान असणं जरुरी आहे. प्रत्येक जण यात सहभागी होऊन काम करू शकतो आणि हे अभियान यशस्वी करू शकतो. हे आवाहन सर्वांना उद्देशून आहेः तुम्ही इंजिनियर असा वा डॉक्टर, शिक्षक असा वा स्वयं-रोजगारी, वकील असा वा कष्टकरी, वार्ताहार, गृहिणी अथवा विद्यार्थी, ज्याला कुणाला यात भाग घ्यायचा आहे आणि ज्यांना असं वाटतं की एक-एक मूल मोलाचं आहे, त्या सर्वांची ही चळवळ आहे.
चला, आपल्या मुलांना एका उज्ज्वल भविष्याकडं नेऊया आणि आपल्या देशाचा माथा उजळ करु या!
या मोहिमेत सहभागी होण्यासाठी लिहा everychildcounts.pune@gmail.com वर किंवा
कॉल करा रजनी परांजपे यांना 9371007844 वर किंवा
कॉल करा मंदार शिंदे यांना 9822401246 वर.
अधिक माहितीसाठी,
पहा http://everychildcounts-pune.blogspot.com किंवा
जॉइन व्हा http://on.fb.me/eccpune वर किंवा
फॉलो करा http://twitter.com/eccpune ला.
No comments:
Post a Comment