Friday, March 1, 2013

शालाबाह्य मुलांपर्यंत पोचण्यासाठी आता 'वेबसाईट'ची मदत

'शिक्षणहक्क कायदा २००९' अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील सर्व मुला-मुलींना 'मोफत व सक्तीचे शिक्षण' मिळण्याची सोय करण्यात आलेली असली तरी प्रत्यक्षात याची गरज असलेल्या मुलांपर्यंत व त्यांच्या पालकांपर्यंत ही माहिती पोचलेली दिसत नाही. त्यामुळे, हा कायदा होऊन तीन वर्षे झाली तरी आपल्या आजूबाजूला कित्येक शालाबाह्य मुले आढळून येतात. अशी मुले शोधून, त्यांच्या पालकांशी बोलून, जवळच्या मनपा शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी 'एव्हरी चाइल्ड काउंट्स' हे नागरिक अभियान नोव्हेंबर २०११ मध्ये सुरू करण्यात आले.

या अभियानांतर्गत, पुण्यातील नागरिकांच्या व सेवाभावी संस्थांच्या मदतीने गेल्या वर्षी सुमारे ७०० वंचित मुलांना शाळेत दाखल करण्यात आले. पुण्याच्या सर्व भागांतून अशा मुलांची माहिती गोळा करणे, हे या अभियानासमोरील सर्वात मोठे आव्हान होते व आहे. याउलट, दररोज रस्त्याने ये-जा करणार्‍या नागरिकांना सिग्नलजवळ, फूटपाथवर, तसेच मजूर वस्त्यांजवळ शाळेत जाण्याच्या वयाची मुले फिरताना दिसतात; पण त्यांच्याबद्दल कुणाला सांगायचे, त्यांना कशी मदत करायची, हे कळत नाही.

या सर्व अनुभवांवरुन, 'एव्हरी चाइल्ड काउंट्स' हे अभियान सुरू करणार्‍या 'डोअर स्टेप स्कूल' या सेवाभावी संस्थेने एक वेबसाईट तयार करून घेतली आहे. या वेबसाईटवर कोणीही नागरिक त्यांना दिसलेल्या शालाबाह्य मुलांची माहिती नोंदवू शकतात. या वेबसाईटवर, अचूक ठिकाण नोंदवण्यासाठी नकाशाची सोय असून, काही प्रश्नांची उत्तरे दिल्यावर नागरिकांनी नोंदवलेली माहिती सर्वांसाठी प्रकाशित होते. तसेच, या अभियानातील कार्यकर्त्यांना ही माहिती ई-मेलद्वारे मिळाल्याने, सदर मुलांचा शोध घेणे सोपे होऊन त्यांच्या शाळा-प्रवेशाची प्रक्रिया जलद होण्यास मदत होते.

www.eccpune.org/reportchildren या वेबसाईटवर निःशुल्क नोंदणी करून नागरिक मुलांची माहिती नोंदवू शकतात, तसेच पूर्वी नोंदवलेली माहिती पाहू शकतात. ही वेबसाईट वापरण्यासंदर्भात पुणे मनपाच्या शिक्षण मंडळ सदस्यांसाठी विशेष प्रात्यक्षिकाचे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी, सदर वेबसाईटवरून मिळणार्‍या माहितीच्या उपयुक्ततेबद्दल व शिक्षण मंडळाच्या पटनोंदणी अभियानास होऊ शकणार्‍या मदतीबद्दल मंडळाच्या सदस्यांनी विश्वास व्यक्त केला.

'मेवन सिस्टीम्स' या पुण्यातील सॉफ्टवेअर कंपनीच्या 'सीएसआर' अंतर्गत तांत्रिक सहकार्याने, तसेच टाटा सामाजिक विज्ञान संस्था (मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा उपयोग करून शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास मदत करावी, असे आवाहन 'एव्हरी चाइल्ड काउंट्स' नागरिक अभियानातर्फे करण्यात येत आहे. www.eccpune.org/reportchildren या वेबसाईटबद्दल व शिक्षणहक्क कायद्यासंदर्भातील या अभियानाबद्दल अधिक माहितीसाठी संपर्कः

रजनी परांजपे - ९३७१००७८४४
मंदार शिंदे - ९८२२४०१२४६

No comments:

Post a Comment