Friday, April 6, 2012

माझ्या प्रार्थना-पुस्तकातली भर

बांधकामाच्या साइट वरील 'एक-एक मूल मोलाचं' (एव्हरी चाइल्ड काउंट्स) च्या वर्गात आज मी जरा लवकरच पोहोचले. मुलं प्रार्थनेसाठी तयार होत होती. त्यांनी उत्साहानं आणि 'नमस्ते टीचर' असं म्हणून केलेल्या स्वागतामुळं मी प्रभावित झाले. माझा उत्साह द्विगुणित झाला. मी हसून हात जोडले आणि प्रार्थनेत सामील झाले.

लवकरच गोड आणि स्पष्ट आवाजात त्यांनी प्रार्थना म्हणायला सुरुवात केली.

"हे परमेश्वरा, मला चांगली बुद्धी दे.
मला शाळेत जाण्याची संधी दे.
मी कोठेही गेलो/गेले तरी शाळा शोधून काढीन.
मी नियमित शाळेत जाईन व जास्तीत जास्त शिकेन.
कितीही अडचणी आल्या, कितीही त्रास झाला तरी शाळा कधीही सोडणार नाही.
अशिक्षित, अडाणी राहणार नाही.”


मी स्वतःला चिमटा काढून बघितलं. मी खरंच अशी काहीतरी प्रार्थना ऐकली का? हे केवळ देवाकडं मागणं नव्हतं तर अनेक वचनांनी परिपूर्ण अशी ही विनंती होती.

प्रथम विद्यार्थीनी म्हणून आणि नंतर शिक्षिका म्हणून मी अनेक प्रकारच्या प्रार्थना पाठ केल्या आहेत. काही देवतांची भक्तिगीतं, काही संतांची भजनं, देशभक्तीपर गीतं, निसर्गाची स्तुती करणारी गीतं, अशी कितीतरी. परंतु सर्वशक्तिमान देवाकडं शाळेत जाण्याची संधी मागणारी ही प्रार्थना ह्यापूर्वी कधी म्हटल्याचं आठवत नाही.

मला आठवतंय, मी नेहमी देवाकडं शाळेपासून लांब राहण्यासाठीच विनंती करत असे. जसं की, पूर येऊन शाळा बंद पडू दे, काही संकट येऊ दे आणि शाळेला सुट्टी मिळू दे. पण देवाकडं कोणत्याही परिस्थितीत अति-उत्साहानं शाळेत जाण्याची संधी मागणारी प्रार्थना? छेः ही प्रार्थना नक्कीच माझ्या प्रार्थना-पुस्तकात नव्हती.

मी योग्य शाळेचा शोध घेतला होता का? नाही, माझ्या पालकांनी माझ्यासाठी ती गोष्ट केली, आणि मी नियमित हजर राहीन याची काळजी घेतली. शाळेला जाण्यामध्ये मला काही अडथळे, अडचणी आल्या का? मला अतिशय हास्यास्पद उत्तर मिळालं - गजर झाला की अंथरुणातून उठायचं, वेळेवर घरचा अभ्यास आणि प्रोजेक्ट पूर्ण करायचं, आणि हो, शाळेच्या बससाठी वेळेवर तयार व्हायचं. सर्व गोष्टी हाताशी असून देखील मी मनापासून माझ्या सर्व ताकदीनिशी अभ्यास केला का? नाही, खरंच नाही. मला नेहमी शेरा मिळत असे - 'चांगला प्रयत्‍न; परंतु अजून चांगले करु शकेल.'

सहजपणे मिळणार्‍या गोष्टींची आपल्याला किंमत का वाटत नाही? खूप कष्ट केल्यावर, घाम गाळल्यावर आणि उपासमार झाल्यावरच एखाद्या गोष्टीची किंमत कळते का? किंवा या ठिकाणी अशा एखाद्या शाळेच्या प्रार्थनेतून...

प्रार्थना संपली आणि मी शिक्षकांना ती प्रार्थना माझ्या वहीत लिहून देण्याची विनंती केली. मुलांच्या गोंगाटातही मी ती प्रार्थना परत परत वाचली. मुलांना माझ्याबरोबर अनेक विषयांवर गप्पा मारायच्या होत्या. मी त्यांच्या उत्सुक चेहर्‍यांकडं पाहून त्यांना दोन मिनिटं शांत राहण्याची विनंती केली आणि स्वतःसाठी एक प्रार्थना लिहिली.

“हे परमेश्वरा, मला चांगली बुद्धी दे.
मला मुलांना शाळेत घालण्याची संधी दे.
मी कोठेही गेलो/गेले असले तरी शाळेत जाण्यासाठी उत्सुक असलेली मुलं शोधून काढीन.
अशा मुलांना जवळच्या शाळेत प्रवेश मिळवून देईन, म्हणजे ती रोज शाळेत जाऊ शकतील. आणि ती खूप शिकतील याकडं लक्ष देईन.
कितीही अडचणी आल्या, कितीही त्रास झाला तरीही मुलं शाळा सोडणार नाहीत याकडं लक्ष देईन.
एकही मूल अडाणी, अशिक्षित राहणार नाही, याची खात्री करेन.”


मला नक्की माहिती आहे की अनेक जण माझ्या या प्रार्थनेत सहभागी होतील. आपली मुलं शाळेत शिकावीत असं आपणा सर्वांनाच वाटतं. आपण खरंच भाग्यवान आहोत, आपण कोणत्याही अडचणींशिवाय, अडथळ्यांशिवाय शाळेत जाऊ शकलो. पण जी मुलं अशी भाग्यवान नाहीत त्यांना आपण आता मदत करुया. 'एक-एक मूल मोलाचं' या उपक्रमात आपण सगळे सहभागी होऊया. सहा वर्षांची सर्व मुलं जून २०१२ मध्ये शाळेत जातील आणि पुण्यातल्या प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार मिळेल, यासाठी आपण प्रयत्‍नशील राहूया.

प्रत्येक मूल मोलाचं आहे, त्याला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठीच्या समान संधी त्याला मिळाल्याच पाहिजेत.मूळ लेख - अर्चना व्यवहारकर
archana.vyavaharkar@gmail.com

मराठी अनुवाद - विद्या तेरदाळकर
vterdalkar@gmail.com

No comments:

Post a Comment